Wednesday, 2 November 2016

76 हजार मतदारांचा प्रभाग

महापालिका निवडणुकीसाठीचे प्रारूप प्रभागरचनेची छाननी करून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या समितीने राज्य निवडणूक आयोगाकडे सोमवारी सादर केले. शहरातील प्रत्येक प्रभाग सुमारे 76 हजार मतदारांचा ठेवावा, अशी शिफारस या समितीने केली आहे. पुणे शहराबरोबरच पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरचीही प्रभागरचना विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली. 

महापालिका निवडणूक पुढील वर्षी 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान एका दिवशी होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने प्रभागरचनेचे प्रारूप तयार केले आहे. सध्याचे प्रभाग दोनसदस्य पद्धतीचे आहेत. आगामी निवडणूक चार सदस्यांचा प्रभाग, या पद्धतीने होणार आहे. परिणामी, सध्याच्या 80 टक्‍क्‍यांहून अधिक प्रभागांची मोडतोड होऊन चार सदस्यांचे नवे प्रभाग अस्तित्वात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने तयार केलेली प्रारूप प्रभागरचना छाननीसाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या समितीकडे सात सप्टेंबर रोजी सादर करण्यात आली होती. गेले पाच दिवस त्याची छाननी करून आणि आवश्‍यक तेथे बदल करून या त्रिसदस्य समितीने राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभागरचनेचे प्रारूप सोमवारी सादर केले. 

महापालिका प्रशासनाने प्रभागरचना करताना 39 प्रभाग प्रत्येकी चार सदस्यांचे; तर दोन प्रभाग प्रत्येकी तीन सदस्यांचे केले होते. त्रिसदस्य समितीने ही रचना कायम ठेवून 162 सदस्यांची बेरीज गाठली आहे. नैसर्गिक नाले, राष्ट्रीय व राज्य महामाग, नदी आदींच्या सीमारेषांची निश्‍चिती प्रभाग ठरविताना करण्यात आली आहे. छाननीमध्ये प्रत्येक प्रभागाची रचना, लोकसंख्या आणि भौगोलिक हद्द यांचा आढावा घेण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. प्रभागरचना उत्तरेकडून पश्‍चिमेकडे आणि पश्‍चिमेकडून दक्षिणेकडे होणार आहे. त्यामुळे शहरात धानोरीपासून प्रभागरचना सुरू होणार असून, हडपसर किंवा सिंहगड रस्त्यावर धायरीमध्ये समारोप होईल. प्रत्येक प्रभागासाठी 76 हजार मतदार निश्‍चित केले असले तरी, ही संख्या 10 टक्के कमी-जास्त होऊ शकते. दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरचीही प्रभागरचना विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या समितीने निश्‍चित करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली. 

No comments:

Post a Comment