Wednesday, 2 November 2016

महापालिका निवडणूक 2017, प्रभाग 1 कळस-धानोरी

महापालिका निवडणूक 2017, प्रभाग 1 कळस-धानोरी
 
उमेदवारांचा शोध; प्रचारासाठी होणार दमछाक
नव्या प्रभागरचनेत भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठा प्रभाग ठरलेल्या कळस-धानोरीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकच जागा या चार सदस्यांच्या प्रभागात असल्याने प्रमुख पक्षांमध्ये-मुख्यतः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यासाठी चुरस आहे. भाजपकडे इच्छुक अनेक असले तरी, "राष्ट्रवादी‘मधून पडझड झाल्यास त्यावरही भाजपचे उमेदवार ठरू शकतात. काही पक्षांना उमेदवार मिळाले असले तरी, पळवापळवीच्या राजकारणामुळे त्यांची नावे जाहीर झालेली नाहीत. अंतिम टप्प्यात या प्रभागात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्‍यता आहे.

कळस-धानोरी या प्रभागाची लोकसंख्या सुमारे 85 हजारांच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे आरक्षणाचे अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) सर्वसाधारण, नागरिकांचा मागास वर्ग महिला आणि सर्वसाधारण वर्ग असे चार प्रकार आहेत.

धानोरी, कळस गावठाण, गंगाकुंज सोसायटी, लक्ष्मी टाउनशिप, ब्रुकसाइड सोसायटी, विशाल परिसर, आरएनडीई कॉलनी, भीमनगर वसाहत, विश्रांतवाडी सर्व्हे क्रमांक 112, सिद्धार्थनगर, मुंजाबा वस्ती, भैरवनगर, गोकुळनगर, आनंद पार्क, चौधरीनगर, खेसे पार्कचा काही भाग, महालक्ष्मी विहार, विश्रांत सोसायटी, मधुबन सोसायटी, म्हस्के वस्ती, कळस गणेशनगर, ग्रेफ सेंटर आदी भाग या प्रभागात समाविष्ट झाला आहे. लोहगाव-फुलेनगरचाही काही भाग या प्रभागात समाविष्ट झाला आहे. या प्रभागात "राष्ट्रवादी‘चे बॉबी टिंगरे, सतीश म्हस्के, रेखा टिंगरे आणि मनसेच्या रेखा साळुंखे या विद्यमान नगरसेवकांचा जुना प्रभाग बहुतांश प्रमाणात समाविष्ट झाला आहे.

‘राष्ट्रवादी‘चे तीन विद्यमान नगरसेवक रिंगणात असले तरी, सर्वसाधारण गटासाठी एकच जागा असल्याने पक्षापुढे प्रश्‍न निर्माण झाला आहे. ओबीसीचे प्रमाणपत्र कोणा-कोणाकडे आहे, हे अद्याप गुलदस्तातच आहे. काहींकडे ते आहे, असे सांगण्यात येत असले तरी, खुल्या गटातूनही निवडणूक लढविण्यास ते इच्छुक आहेत. त्यामुळे "राष्ट्रवादी‘च्या उमेदवारीबाबत औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीत "राष्ट्रवादी‘चे प्राबल्य असलेल्या या भागातून भाजपला लक्षणीय मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपकडे इच्छुक अनेक असले तरी, "राष्ट्रवादी‘मधून पडझड झाल्यास त्यावरही भाजपचे उमेदवार ठरू शकतात, अशी चिन्हे येथे आहेत. या प्रभागात "एससी‘ आणि "एसटी‘चे आरक्षण असलेले सक्षम उमेदवार मिळविण्याचे भाजप, मनसे, शिवसेना आणि कॉंग्रेसपुढे आव्हान आहे. काही इच्छुक असले तरी हमखास निवडून येतील, अशा उमेदवारांचा त्यांचा शोध सुरू आहे. काही पक्षांना उमेदवार मिळाले असले तरी, पळवापळवीच्या राजकारणामुळे त्यांची नावे जाहीर झालेली नाहीत. शिवसेनेनेही त्यासाठी त्यांच्या संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. या प्रभागात पक्षांतर होईल आणि त्यातून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्‍चित होतील, अशी कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा आहे. कॉंग्रेसची या प्रभागात काही भागात ताकद आहे, परंतु आरक्षणांमुळे त्यांचेही गणित बिघडले आहे. तसाच प्रकार मनसे, शिवसेनेबाबत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे कार्यकर्ते भाजपच्या कोट्यातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत, तर मुंजाबा वस्तीतील भीमाशंकर मंडळ "एसटी‘चे उमेदवार निश्‍चित करतील, असेही सांगण्यात येते. शहरी मतदार आणि ग्रामीण मतदारांचा भरणा असलेल्या या भागात विश्रांतवाडी, भीमनगरमध्ये वस्ती भाग आहे. नव्या परिसरात मोठा भाग जोडला गेल्यामुळे उमेदवार शोधण्यापासून प्रचारापर्यंत सर्वच राजकीय पक्षांची दमछाक होणार असल्याने मतदानाचा "ट्रेंड‘ही कोणाला गृहीत धरता येणार नाही.

प्रमुख इच्छुक...
राष्ट्रवादी कॉंग्रेस - सतीश म्हस्के, बॉबी ऊर्फ अनिल टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, विशाल टिंगरे, डॉ. संजय गबाले, रेखा टिंगरे, ऐश्‍वर्या जाधव, छाया उकिरडे, संध्या पोळ, नंदा मोरे.
कॉंग्रेस - हुलगेश चलवादी, मधुकर जक्कल, शशिकांत टिंगरे, डॉ. प्रदीप केसकर.
भाजप - अतुल परांडे, कुणाल टिंगरे, अलका खाडे, अश्‍विनी सोनावणे, राजेश लोकरे तसेच, बेगम शहारे व संगीता ठोंबरे (रिपब्लिकन पक्ष).
मनसे - सुनीता साळुंखे, अनिल साळुंखे, गणेश पाटील, विवेक टिंगरे.
शिवसेना - सुनील टिंगरे, बंटी म्हस्के.

Creadits; esakalhttp://www.esakal.com/

No comments:

Post a Comment